भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

बंकटस्वामी महाविद्यालय बीड चे उपप्राचार्य प्रा. बन्सी काळे हे आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा व स्वभावाचा परामर्श घेणारा विशेष लेख

प्रा. बन्सी गणपतराव काळे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या 33 वर्षांमध्ये त्यांनी बंकटस्वामी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, पर्यवेक्षक आणि उपप्राचार्य पदावर आपली सेवा सचोटीने पूर्ण केली. मित्रहो वास्तविक बंकटस्वामी महाविद्यालयाचा आणि माझा तसा विशेष शैक्षणिक संबंध नाही. मी बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि आदरणीय डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी के एस के महाविद्यालय मध्ये मला नोकरी दिली. मात्र बंकटस्वामी मध्ये असणारे भाऊ हे माझे शालेय जीवनापासूनचे महाविद्यालय आहेत. ते आमचे विद्यापीठही आहेत.

आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा उहापोह करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने व उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांच्या स्नेही जणांच्या वतीने नात्यातले भाऊ व्यक्त करतो. भाऊ या शब्दाला आपल्या संस्कृतीत आदर आहे. आपुलकी आहे. आपलेपणा आहे. आम्ही आदराने प्रा बी जी काळे यांना भाऊ म्हणतो परंतु नात्यागोत्याला त्यांनी  खरा भावासारखा आधार दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. भाऊ या शब्दार्थाने आम्हा नात्यागोत्यासाठी ते सर्वांचाच भाऊ आहेत. आमचा आधारवड आहेत. या संबंधीचे दोन-तीन ठळक प्रसंग सांगतो. 
आईच्या देहांतानंतर बहिण भावासह कुटुंब सावरण्यासाठी भाऊ खंबीरपणे उभे राहिले. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर पुतणे, पुतणी यांना बापाचा आधार देणारे भाऊ होते. भावाचे घर त्यांनी तीळभरही उघडे पडू दिले नाही. किंबहुना ते घर भावाचे आहे ही अंतर ठेवण्याची भावना त्यांच्यात कधीच नसते. त्यांचे मेहुणे गुंड साहेबांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बहिणीला समर्थ आधार देणारे आणि भाच्यांचं संपूर्ण करियर उभ करून देणारे भाऊच होते. 2007 मध्ये माझं आयुष्य उध्वस्त करून टाकणारा प्रसंग आला. तेव्हा मला सोडविण्यासाठी एडवोकेट भाऊसाहेब जगताप यांना सोबत घेऊन कोर्टात लढणारे भाऊच होते. भाऊ ही उपाधी त्यांना किती सार्थ आहे हे सांगणारे असे कितीतरी लहान मोठे प्रसंग सांगता येतील. केवळ रक्ताच्या नात्याने, जन्माच्या नात्याने भाऊ असून उपयोग नाही खरा भाऊ याला म्हणतात

अतिशय सौजन्यशील मृदूभाषी भाऊंचा चेहरा आम्हा नात्यागोत्याचे कोणतेही किचकट प्रसंग सोडविण्यासाठी आश्वासक वाटतो. आजच्या मायावी मोबाईलच्या दुनियेत आणि शुष्क कोरड्या होत असलेल्या नात्यामध्ये भाऊ सारखा सर्वसमावेशक समन्वयक सोबत असल्यावर जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. "काहीही होऊ द्या भाऊ आहेत ना बघायला" ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.
भाऊंचा विषय प्राणीशास्त्र पण ते खरे समाजशास्त्राचे मास्तर असायला हवे होते. मराठा संघटनांमध्येही ते अग्रेसर राहिले आहेत. केवळ नात्यातलेच नाही तर मित्र परिवारातले प्रश्नही त्यांनी सोडविले आहेत. तिकडेही त्यांची केमिस्ट्री मस्त जुळण्याची उदाहरणे आहेत. माननीय विनायकराव मेटे साहेब हे त्यांचे खास जीवस्य मित्र होते. साहेबांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र पोरका झाला. मराठा समाज पोरका झाला तसा त्यांचा मित्रपरिवार ही हवालदिल झाला. मित्राच्या अपघाती जाण्याचे दुःख काय असू शकतं ते भाऊंना विचारा.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा...
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा...
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
आज साहेब असते तर ते इथे असते. या व्यासपीठावर असते. दोस्ताच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी आले असते.
मित्रांनो माणसाच्या आयुष्यात हजरवून टाकणारे अनेक प्रसंग येतात परंतु असे प्रसंग धीराने निभावून नेणे आणि पडलो तरी तितक्याच ताकदीने पुन्हा उभे राहणे याला खरी किंमत आहे. पडणे महत्त्वाचे नाही उभे राहणे महत्त्वाचे आहे हे भाऊंनी आम्हाला शिकविले. तुम्हा आम्हाला आणि विद्यार्थ्यांनाही उभे करण्याचे काम भाऊंनी केले आहे.

1990 पासून नोकरीविषयक जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. आमच्या जुकटा संघटनेतही ते अग्रेसर होते. औरंगाबाद बोर्डातली कामे, उपसंचालक कार्यालयातील काम, बारावी बोर्ड परीक्षेतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी निर्विघ्न पार पाडल्या. आता सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये ऍडमिशनच्या अडचणी आहेत मात्र भाऊ नेहमीच विद्यार्थ्यांच्या गराड्यात राहिले आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत हे आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आम्ही सेवानिवृत्त होऊ की नाही, तो प्रसंग आमच्या वाट्याला येईल की नाही हा भविष्यातील मोठा प्रश्न आहे. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेशाकडे कल वाढत असल्याने आणि भाऊंचा विषय झूलॉजी असल्याने पुढेही त्यांना अध्यापनाची संधी मिळू शकते मात्र ही ऐच्छिक गोष्ट आहे. आमचे म्हणाल तर त्यांनी अशीच नात्याची सुंदर विन विनावी. कारण आज शाळा शिकविणारे मास्तर खूप आहेत, एखाद्या प्रश्नाचे उत्तर गुगल वर तर झिरो मिनिटात सापडतात. ऑनलाइन टीचिंग आणि मार्गदर्शन व्हिडिओ काय कमी आहेत का? पण माणसा माणसातला संवाद हरपत चालला आहे. जिवंत माणसातला समन्वय गेला आहे. तो जोडणारा माणूस पाहिजे. अगदी घरातल्या दोन माणसात, जवळच्या नात्यामध्ये आपुलकी प्रेम आपलेपणा कुठे आहे? किमान आमच्या गोतावळ्यात तो भाऊंच्या रुपाने तो आधार आहे. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. भाऊ सेवानिवृत्त होत आहेत मात्र आमच्या नीता ताई चे काय ? आई कधी रिटायर होते काय? तसे आमची ताई कधी रिटायर होते ? कुटुंब वस्सल , सर्व पई पाहुण्यांच हसत स्वागत करणाऱ्या आमच्या मराठी चित्रपटातल्या त्या अलका कुबल आहेत. ईश्वर नीता ताईंना आयु आरोग्य देवो. भाऊंनी असेच निरामय निरोगी आयुष्य जगावे ह्या माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

धन्यवाद.

*डॉ बापू गणपतराव घोलप*
संपादक 
विद्यावार्ता रिसर्च जर्नल
https://wa.me/qr/5JS3BTIYI356B1

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे